Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणी सध्या अक्षरशः वैतागल्या आहेत. सरकारने गाजावाजा करत सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाही. विशेष म्हणजे अनेक महिलांनी वेळेत ई-केवायसी केली, कागदपत्रे पूर्ण केली, तरीही पैसे मिळाले नसल्यामुळे आता थेट रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला जात आहे. मतदानाच्या वेळीच आम्ही लाडक्या होतो का? असा सवाल महिलांकडून उघडपणे विचारला जात आहे. Ladki Bahin Yojana
वाशिम जिल्ह्यात तर चित्र अधिकच गंभीर आहे. सलग तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही, घरखर्च, औषधोपचार, मुलांचं शिक्षण कसं करायचं, असा सवाल करत महिलांनी प्रशासनाला घेरलं. अमरावतीमध्ये याआधीच आंदोलन झालं होतं, तर यवतमाळमध्येही हप्ता रखडल्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. अनेक महिलांनी स्पष्टपणे सांगितलं की योजना आहे म्हणून आशा ठेवली, पण नियमित पैसेच मिळत नसतील तर आम्ही कोणाकडे जायचं?
या रखडलेल्या हप्त्यावरून राजकारणही तापलं आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत ही योजना केवळ निवडणुकीपुरतीच होती का? असा थेट सवाल केला आहे. निवडणुका झाल्या आणि आता बहिणींची आठवणही सरकारला राहिली नाही का, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी मंत्र्यांकडून मात्र तांत्रिक कारणं पुढे केली जात आहेत.
मंत्री पंकज भोयर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू असल्याचं सांगत, काही तांत्रिक अडचणींमुळे हप्ता उशिरा झाल्याचं मान्य केलं आहे. लाडक्या बहिणींचे हप्ते लवकरच सुरळीत सुरू होतील असं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार, याबाबत ठोस तारीख कुणीही सांगायला तयार नाही.
दरम्यान, ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार पात्रता तपासण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पण ही पडताळणी कधी पूर्ण होणार आणि त्यानंतर हप्ता कधी जमा होणार, याबाबतही संभ्रम कायम आहे.
यातच आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, लाडक्या बहिणींचा रखडलेला हप्ता पुन्हा आचारसंहितेच्या कचाट्यात अडकणार का, अशी भीती महिलांमध्ये व्यक्त केली जात आहे. पैसे मिळतील अशी आश्वासनं खूप ऐकली, पण आता खात्यात रक्कम जमा झाल्याशिवाय विश्वास बसणार नाही, अशी भावना अनेक लाडक्या बहिणी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे सरकार लवकर निर्णय घेऊन हा हप्ता देणार की पुन्हा महिलांची प्रतीक्षा वाढणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
1 thought on “या लाडक्या बहिणींना मिळाले नाही 1500 रुपये यामध्ये तुमचे नाव आहे का चेक करा”