Ladki Bahin Yojana Update : जानेवारी महिना संपत आला आहे, तरीही राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही जानेवारीचा ₹१५०० चा हप्ता जमा झालेला नाही. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असतानाही पैसे न आल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा हप्ता जानेवारीत येण्याची शक्यता आता जवळपास मावळली असून, फेब्रुवारी महिन्यातच पैसे जमा होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
राज्यातील अनेक महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही दरमहा घरखर्चाचा महत्त्वाचा आधार आहे. अशा परिस्थितीत हप्ता उशिरा मिळाल्याने अनेक कुटुंबांच्या आर्थिक गणितांवर परिणाम होत असल्याचं वास्तव आहे.
जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत येणार?
लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील उशिरा जमा करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता जानेवारीचा हप्तादेखील उशिरा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत जानेवारी महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच यासंदर्भात स्पष्ट निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीआधी पैसे येण्याची शक्यता अधिक
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या आधीच महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वीही महापालिका निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात हप्ते जमा करण्यात आले होते.
त्यामुळे यावेळीही सरकार निवडणुकीआधी महिलांना दिलासा देण्यासाठी ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान ₹१५०० जमा करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हे सर्व अंदाज असून अंतिम निर्णय अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. Ladki Bahin Yojana Update
केवायसी अडचणींमुळे अनेक महिलांचा हप्ता अडकला
लाडकी बहीण योजनेत केवायसी (KYC) प्रक्रियेदरम्यान अनेक तांत्रिक आणि कागदपत्रांशी संबंधित अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे पात्र असतानाही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. याची गंभीर दखल घेत आता शासनाने प्रत्यक्ष केवायसी पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार, अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत. यामुळे चुकीमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे अडकलेले हप्ते लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. तसेच, केवायसीसाठी महिलांना अप्रत्यक्षपणे मुदतवाढ मिळाल्याचंही बोललं जात आहे.
लाडक्या बहिणींनी काय करावं?
ज्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकाशी संपर्क साधावा. तसेच, बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही, हेही तपासणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य कागदपत्रे आणि माहिती असल्यास पुढील हप्त्यात पैसे मिळण्याची शक्यता नक्कीच वाढेल.
महिलांना थोडी वाट पाहावी लागणार…
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता उशिरा येणार असला, तरी तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार महिलांना दिलासा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहणं महत्त्वाचं आहे.